Tuesday, 11 March 2014

मुद्रक व प्रकाशकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाचे पालन करावे - जिल्हाधिकारी

बुलडाणा दि 11 : भारत निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127(अ) अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध असून त्यानुसार छपाई व्यवसायिकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 127(अ) चे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिले. निवडणूक कालावधीत निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके, मुद्रण व प्रकाशन या बाबींचे नियंत्रण लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127(अ) मधील तरतूदीद्वारे केले जाते. या अंतर्गत कोणतेही निवडणूक पत्रक, भित्तीपत्रक किंवा अशा इतर छापलेल्या साहित्यावर छापणाऱ्या व प्रसिध्द करणाऱ्या व्यक्तींची (मुद्रक व प्रकाशक) नावे व पत्ते पत्रकाच्या प्रिंट लाईनमध्ये स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. मुद्रांकित केलेल्या साहित्याची छपाई केल्यानंतर त्याच्या 4 प्रती जिल्हादंडाधिकारी कार्यालयात 3 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. जोडपत्र अ मध्ये कलम 127(अ)(2) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे असा मजकूर छापण्यात आला असल्यापासून तीन दिवसाच्या आत मुद्रकाने प्रकाशकाकडून मिळविलेले घोषणापत्रक जिल्हादंडाधिकारी कार्यालयात सादर केले पाहिजे. या घोषणापत्रकावर प्रकाशकाची स्वाक्षरी नावानिशी घेण्यात यावी. तसेच भाग क्रमांक 2 मध्ये साक्षीदारांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. हे साक्षीदार प्रकाशकास व्यक्तीश: ओळखणारे असावे. जोडपत्र ब मध्ये मुद्रकाने मुद्रित केलेल्या साहित्याचा संपूर्ण तपशील, प्रकाशकाचे नाव व पत्ता, प्रतींची संख्या छपाईचा खर्च,छपाईचा दिनांक इत्यादी सर्व माहिती भरून स्वत:च्या नावासह स्वाक्षरी करुन सादर करावे.लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127(अ) मधील तरतुदींचा भंग केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल आणि संबंधिताविरुध्द अतिशय कडक कार्यवाही (ज्यामध्ये मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्याचा समावेश आहे.) केली जाईल असे निर्देश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले. प्रेसधारकांनी याबाबतीत अधिक माहितीकरिता आणि प्रतिज्ञापत्राकरिता जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील गृहशाखा येथे संपर्क साधावा. कोणीही प्रेसधारक जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र करुन दिल्याशिवाय लोकसभा निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकिय पक्ष यांच्याकरिता छपाई करुन देतील त्यांच्या विरुध्द उपरोक्त अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याबाबतच्या सविस्तर सूचना कार्यालयीन वेळेत जिल्हादंडाधिकारी कार्यालय(गृह विभाग) येथे उपलब्ध असतील अशी माहितीही यावेळी देण्यात आली.आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापनाआगामी लोकसभा निवडणूक 2014 ची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक 5 मार्च 2014 पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टिकोनाने जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
  

No comments:

Post a Comment