Sunday, 6 April 2014

हो.. फरक पडतो…!


यंदाची लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा फायदा घेणारी निवडणूक ठरणार आहे. यापूर्वीच्या काळात ज्यांनी निवडणूक कामकाज केले आहे, अशा सर्वांना ही निवडणूक नवा अनुभव देणारी ठरणार हे निश्चित आहे.

तंत्राच्या क्रांतीमुळे पूर्वीच्या मतपेट्या आणि मतपत्रिका छपाई अशा खूप मोठ्या व्यापातून सर्वांची सुटका झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारांची मानसिकता देखील महत्वाची ठरणारी आहे. काय फरक पडतो माझ्या एका मताने… असा विचार करणारा मतदार आता मतदान करण्यास ऊत्सुक असल्याचे सकारात्मक चित्र यंदा दिसत आहे. यामागेही तंत्राची प्रगती हेच कारण आहे.

गेल्या दशकभरात मुद्रीत माध्यमांसोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली. आऊटडोअर ब्रॉडकास्टींग व्हॅन्स अर्थात ओ.बी.व्हॅन्सची जागा आता सॅटेलाईट लिंकिंग किट्सनी घेतल्याने प्रक्षेपण क्षेत्रात क्रांती आली. यामुळे कोणत्याही ठिकाणावरुन थेट प्रक्षेपणासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच खर्च यात कपात झाली. परिणामी छोट्या छोट्या ठिकाणांवरुन थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळत आहे.

दुसऱ्या बाजूला यंदा प्रथमच संवेदनशील मतदान केंद्रांवर होणार असलेल्या मतदानावर निवडणूक आयोग वेबकास्टींगच्या मदतीने थेट लक्ष ठेवणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रीया अतिशय पारदर्शी होणार आहे. याचाही सकारात्मक परिणाम निवडणुकीत आपणास दिसेल, लोकांची नकारात्मक व उदासीन मानसिकता यामुळे निश्चितपणे दूर होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत आणखी एक महत्वाचा बदल दिसणार आहे तो म्हणजे मतदान करण्यासाठी ज्या पोलचिटस् (Voter Slip) चा वापर होतो, त्या फोटो पोलचिटस् निवडणूक यंत्रणा मतदारांना स्वत: देणार आहे. यापूर्वी राजकीय पक्ष या प्रकारचे काम करताना दिसत होते.

निवडणूक आणि खर्च असंही एक गणित आहे. यंदा उमेदवारांना आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवून दिली आता ती 70 लाख झाली आहे. याचा फायदा उमेदवार उचलत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत ते पोहचत आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून फेसबूक व ट्विटर सारख्या सोशल मीडियातूनही याबाबत प्रचार व प्रसाराचे कार्य होत आहे.

या सर्व बदलांसह येणाऱ्या निवडणुकीत ज्याला राजा म्हटले जाते अशा मतदार राजाला पटलं पाहिजे की… 'हो… माझ्या एका मतानेही फरक पडतो….' म्हणजेच निवडणुकीतील मतांचा टक्का वाढेल.

-प्रशांत दैठणकर,
जिल्हा माहिती अधिकारी, बुलढाणा.

विभागीय आयुक्तांकडून माध्यम कक्षाची पाहणी


बुलडाणा : विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी आज 05- बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी स्थापित माध्यम कक्षात भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, सहायक निवडणूक अधिकारी एस. ए. खांदे आदी उपस्थित होते.

माध्यम कक्षाचे प्रमुख असलेले जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच माध्यम कक्षात होत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्याच्या निवडणूक कामकाजासाठी तयार करण्यात आलेल्या ब्लॉगची त्यांनी यावेळी पाहणी केली. www.election2014buldana.blogspot.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील सर्व माहिती तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येते. सोबतच एसएमएस आणि व्हॉटस्अप व फेसबूक यासारख्या माध्यमांचा आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महान्यूजचा बातम्यांसाठी उपयोग केला जातो, अशीही माहिती त्यांना देण्यात आली. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

याच कक्षात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज चालते. या समितीने आतापर्यंत 27 दृकश्राव्य जाहिरातींना मंजुरी दिली असून 3 जाहिराती मंजूर केल्या आहेत, अशी माहिती श्री. दैठणकर यांनी यावेळी दिली. मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता करण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतही त्यांनी जाणून घेतले.

निवडणूक कामकाजात कसूर केल्यास कठोर कारवाई करणार - डी.आर. बनसोड


बुलडाणा : मतदान कर्मचारी व अधिकारी यांनी नि:पक्षपाती काम करावे. कर्तव्यात कसूर आढळली तर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 05- बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्वतयारी आढावा श्री. बनसोड यांनी आज अमरावती परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्या समवेत घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाद्वारे या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनीही पोलिस दलाच्या तयारीबाबत आढावा सादर केला.

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी याच लोकसभा मतदारसंघातील आहेत. अनेक वर्षे जिल्ह्यात काम करत असल्याने राजकीय मत प्रत्येकाला असते. यातून पक्षपाती कामकाज होण्याचा धोका आहे. कुठल्याही कर्मचाऱ्याने पक्षपात करु नये व मतदारांना मुक्त व निर्भय वातावरणात मतदान करु द्यावे. कोणी पक्षपात करताना आढळला किंवा तशी तक्रार याबाबत आली व ती सिद्ध झाली तर त्या कर्मचाऱ्यास दीर्घ अशी शिक्षा भोगावी लागेल याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असे श्री. बनसोड यांनी यावेळी सांगितले.

मतदारांना मतदान केंद्रात पोहोचणे शक्य व्हावे याची खबरदारी सर्व केंद्र प्रमुखांनी घ्यावी. तसेच उन्हाचे दिवस लक्षात घेता त्यांना मंडप वगैरेची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, असे सांगून श्री. बनसोड म्हणाले, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था असणेही आवश्यक आहे. या सर्व बाबींची खबरदारी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी. मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरावर पांढरी रेघ असावी. त्यापुढेच पक्षांना तंबू लावता येतील. याचे अगदी काटेकोरपणे पालन झाले तर मतदान शांततेत पार पडेल.

मतदान प्रक्रिया पारदर्शी व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी “मॉक पोल” घ्यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षाने अशी रंगीत तालीम घ्यावी व त्याचे रेकॉर्ड ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मतदान केंद्राच्या सुरक्षिततेप्रमाणेच ईव्हीएम वाहतूक आणि मतदानानंतर स्ट्रॉग रुममध्ये ईव्हीएमची सुरक्षा आदींबाबत श्री. कुरुंदकर यांनी माहिती दिली.

माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीने आपले काम करताना स्थानिक स्तरावर होत असलेले पेडन्यूजचे प्रकार शोधून त्याबाबत गुन्हे तात्काळ दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अशा प्रकारच्या बातम्या शोधून काढाव्याच लागतील, जेणेकरुन पेडन्यूजला उघड करता येईल. मतदानाच्या 36 तास आधी मद्य आणि पैशांचे वाटप होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा यांनी सतर्क राहून धाडी टाकल्या पाहिजेत. त्यामध्ये कारवाई करुन अशा प्रकारांना आळा बसवावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकांऱ्यानी केली स्ट्राँग रुमची पाहणी

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्ण सज्ज झाले आहे. मतदानानंतर मतपेट्या ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी तसेच पोलिस उपअधीक्षक (गृह) श्री. मोरे हे त्यांच्या समवेत होते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब ठेंग यांच्याकडे स्ट्राँग रुम आणि मतमोजणी कक्ष उभारणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मोताळा रोडवरील शासकीय आयटीआयमध्ये याची उभारणी सुरु आहे.

या ठिकाणी ज्या खोल्यांमध्ये या मतपेट्या 36 दिवस संरक्षित ठेवायच्या आहेत, त्या खोल्यांना कडेकोट बंदोबस्त देण्याचे काम या ठिकाणी होणार आहे. मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी या खोल्यांमधील वीजप्रवाह बंद करण्यात येणार असून आत सी.सी.टी.व्ही. देखील बसविण्यात यावेत, असे निर्देश श्री. कुरुंदकर यांनी यावेळी दिले.

मतमोजणी केंद्राचे छत बदलण्याचे काम सध्या सुरु आहे. त्या जागेवरील फरशी पूर्ण उखडली असून ती देखील बदलण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या ठिकाणी मतमोजणी कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था व सर्वत्र मजबूत बॅरिकेट्स उभारण्यात येणार आहेत.

अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षक नेमावेत - किरण कुरुंदकर

बुलडाणा : 05- बुलडाणा व 04- रावेर मतदारसंघातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 9 असून या ठिकाणी केंद्र सरकारी कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी यांना सुक्ष्म निरीक्षक म्हणून नेमण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिले.

यासंदर्भात झालेल्या सभेस पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश घेवंदे व निवासी उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे उपस्थित होते.

या सर्व अतिसंवेदनशील केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथे गृह विभागातर्फे सी.आर.पी.एफ जवानांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ही अतिसंवेदनशील मतदान केंद्र पुढीपप्रमाणे आहेत.

विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रिटीकल मतदान केंद्र क्रमांक व नाव पुढील प्रमाणे :- 23-चिखलीमध्ये 20-जि.प.शाळा वैरागड व 21-जि.प.शाळा वैरागड, 24-सिंदखेडराजामध्ये 158-जि.प.शाळा गोंधनखेड, 25-मेहकरमध्ये 148-न.प.शाळा क्र.1 इमामवाडा मेहकर, 26-खामगावमध्ये 152-न.प.ऊर्दू शाळा, टिळक मैदान खामगाव, 27-जळगाव जामोदमध्ये 37- वडगाव व 83-सगोडा, 21-मलकापूरमध्ये 153-जि.प.ऊर्दू शाळा गांधी चौक मलकापूर व 101-नांदुरा.

मतदारांना घरपोच निवडणूक पत्रिका मिळणार - जिल्हाधिकारी

बुलडाणा : मतदारांनी अधिकाअधिक प्रमाणात मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून निवडणूक पत्रिका वाटण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत श्री. कुरुंदकर बोलत होते.

जिल्ह्यात 15 लाख 86 हजार 192 निवडणूक पत्रिका (पोलचिटस्) छापून घेण्यात आल्या आहेत. या पोलचिटस् बिएलओ अर्थात बुथ लेव्हल ऑफिसर यांना देण्यात आल्या असून हे बिएलओ येत्या चार दिवसात घरोघरी भेट देऊन मतदारांना पोहोचविणार आहेत. जिल्ह्यात अधिकाअधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न म्हणून जिल्हाधिकारी या नात्याने नागरिकांना एक पत्र लिहिले व लेटरहेडवरील या पत्राच्या 1 लाख 5 हजार प्रती वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

मतदान करण्याचा संदेश देणाऱ्या रॅलीला सुरुवात

बुलडाणा : आजचे विद्यार्थी हे उद्याचे मतदार आहेत. मतदान करावे असा संदेश विद्यार्थ्यांकरवी पालकांना देण्यासाठी आज मतदार जागृती अभियान रॅलीचे आयोजन जिजामात प्रेक्षागार येथून करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली.

विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरीक रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये प्रथम स्थानी जागृती रथ होता. रॅलीत मतदान करा असा संदेश दिला गेला.

मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता भारत निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून बुलडाणा शहरात, जिल्ह्यात, सर्व शहरांमध्ये व मोठ्या गावांमध्ये जनजागृतीचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. कुरुंदकर यांनी सांगितले. रॅलीमध्ये राजस्थानी युवा संस्थेचे अध्यक्ष ॲड. जितेंद्र कोठारी, सचिव अजय लाहोटी यांनी जागृत रथ तयार केला होता. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर रॅली संगम चौक-जयस्तंभ चौक-बाजार लाईन-महावीर चौक मार्गाने निघून रॅलीचे एडेड शाळेच्या प्रांगणात विसर्जण करण्यात आले.

सदर रॅलीमध्ये जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते. सदर रॅलीमध्ये बुलडाण्यातील शिवाजी हायस्कूल, एडेड हायस्कूल, भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, शिंदे गुरुजी हायस्कूल, रुखाई कन्या शाळा, शारदा ज्ञानपीठ, अब्दुल हमीद हायस्कूल, मौलाना आझाद हायस्कूल, भगवान महावीर विद्यालय, सरस्वती विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, नॅशनल हायस्कूल इत्यादी शाळांचे 6500 विद्यार्थी उपस्थित होते.

रॅलीच्या यशस्वीतेसाठी राजस्थानी युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने अध्यक्ष ॲड. जितेंद्र कोठारी, उपाध्यक्ष राजेंद्र मालू, कोषाध्यक्ष पंकज अग्रवाल, सचिव अजय लाहोटी, सहसचिव मनिष वर्मा व सदस्य डॉ. दिनेश अग्रवाल, अविनाश जैन, संजय तातेड, दिनेश छाजेड, विजय शर्मा, अजय अग्रवाल, अजय शर्मा, अनिल वर्मा यांनी परिश्रम घेतले.