Sunday, 6 April 2014

जिल्हाधिकांऱ्यानी केली स्ट्राँग रुमची पाहणी

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्ण सज्ज झाले आहे. मतदानानंतर मतपेट्या ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी तसेच पोलिस उपअधीक्षक (गृह) श्री. मोरे हे त्यांच्या समवेत होते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब ठेंग यांच्याकडे स्ट्राँग रुम आणि मतमोजणी कक्ष उभारणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मोताळा रोडवरील शासकीय आयटीआयमध्ये याची उभारणी सुरु आहे.

या ठिकाणी ज्या खोल्यांमध्ये या मतपेट्या 36 दिवस संरक्षित ठेवायच्या आहेत, त्या खोल्यांना कडेकोट बंदोबस्त देण्याचे काम या ठिकाणी होणार आहे. मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी या खोल्यांमधील वीजप्रवाह बंद करण्यात येणार असून आत सी.सी.टी.व्ही. देखील बसविण्यात यावेत, असे निर्देश श्री. कुरुंदकर यांनी यावेळी दिले.

मतमोजणी केंद्राचे छत बदलण्याचे काम सध्या सुरु आहे. त्या जागेवरील फरशी पूर्ण उखडली असून ती देखील बदलण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या ठिकाणी मतमोजणी कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था व सर्वत्र मजबूत बॅरिकेट्स उभारण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment