Sunday, 6 April 2014

महिलांचे मतदान वाढावे यासाठी विशेष प्रयत्न - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी



बुलडाणा : महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा यासाठी आशा तसेच अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावागावात मोहीम राबवावी आणि हे प्रमाण वाढेल याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरूंदकर यांनी केले.

महिलांचा मतदानात असणारा सहभाग जिल्ह्यात कमी आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्त्री मतदानाचे प्रमाण पुरुष मतदानाच्या तुलनेत दहा टक्क्याहूनही कमी झालेले होते. याच्या कारणांचा तपास करुन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातील एका विशेष बैठकीत श्री. कुरुंदकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री. कऱ्हाळे, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा अनुप शेंगुलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी या बैठकीस उपस्थित होते.

गावात सातत्याने महिलांच्या बैठका घेऊन आशा व अंगणवाडीताई यांच्या मदतीने त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्यासोबत सक्रीय महिला मंडळे आणि महिला बचतगट तसेच माविमच्या माध्यमातून महिला मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे गरजेचे असल्याचे श्री. कुरूंदकर यांनी सांगितले.

मतदार जागृतीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून श्री. कुरुंदकर यांनी मतदारांना लिहिलेले अनौपचारिक छापील पत्र आज वृत्तपत्रांमधून घराघरात पोहोचले आहे. याच्या धर्तीवर महिला मतदारांना आवाहन करणारे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

वृत्तपत्रे तसेच केबल वाहिन्या आणि इतर माध्यमांतून मतदार जागृतीचे उपक्रम सुरु आहेत. त्यातही महिला मतदारांना प्रोत्साहित करुन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विशेष प्रयत्न येत्या काळात करण्याच्या सूचना श्री. कुरुंदकर यांनी दिल्या. 

No comments:

Post a Comment