| बुलडाणा : मतदान कर्मचारी व अधिकारी यांनी नि:पक्षपाती काम करावे. कर्तव्यात कसूर आढळली तर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 05- बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्वतयारी आढावा श्री. बनसोड यांनी आज अमरावती परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्या समवेत घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाद्वारे या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनीही पोलिस दलाच्या तयारीबाबत आढावा सादर केला. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी याच लोकसभा मतदारसंघातील आहेत. अनेक वर्षे जिल्ह्यात काम करत असल्याने राजकीय मत प्रत्येकाला असते. यातून पक्षपाती कामकाज होण्याचा धोका आहे. कुठल्याही कर्मचाऱ्याने पक्षपात करु नये व मतदारांना मुक्त व निर्भय वातावरणात मतदान करु द्यावे. कोणी पक्षपात करताना आढळला किंवा तशी तक्रार याबाबत आली व ती सिद्ध झाली तर त्या कर्मचाऱ्यास दीर्घ अशी शिक्षा भोगावी लागेल याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असे श्री. बनसोड यांनी यावेळी सांगितले. मतदारांना मतदान केंद्रात पोहोचणे शक्य व्हावे याची खबरदारी सर्व केंद्र प्रमुखांनी घ्यावी. तसेच उन्हाचे दिवस लक्षात घेता त्यांना मंडप वगैरेची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, असे सांगून श्री. बनसोड म्हणाले, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था असणेही आवश्यक आहे. या सर्व बाबींची खबरदारी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी. मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरावर पांढरी रेघ असावी. त्यापुढेच पक्षांना तंबू लावता येतील. याचे अगदी काटेकोरपणे पालन झाले तर मतदान शांततेत पार पडेल. मतदान प्रक्रिया पारदर्शी व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी “मॉक पोल” घ्यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षाने अशी रंगीत तालीम घ्यावी व त्याचे रेकॉर्ड ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मतदान केंद्राच्या सुरक्षिततेप्रमाणेच ईव्हीएम वाहतूक आणि मतदानानंतर स्ट्रॉग रुममध्ये ईव्हीएमची सुरक्षा आदींबाबत श्री. कुरुंदकर यांनी माहिती दिली. माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीने आपले काम करताना स्थानिक स्तरावर होत असलेले पेडन्यूजचे प्रकार शोधून त्याबाबत गुन्हे तात्काळ दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अशा प्रकारच्या बातम्या शोधून काढाव्याच लागतील, जेणेकरुन पेडन्यूजला उघड करता येईल. मतदानाच्या 36 तास आधी मद्य आणि पैशांचे वाटप होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा यांनी सतर्क राहून धाडी टाकल्या पाहिजेत. त्यामध्ये कारवाई करुन अशा प्रकारांना आळा बसवावा, असेही ते म्हणाले. | ||
Sunday, 6 April 2014
निवडणूक कामकाजात कसूर केल्यास कठोर कारवाई करणार - डी.आर. बनसोड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment