Wednesday, 12 March 2014

अधिका-यांनी सजग राहून काम करावे जिल्हाधिकारी - किरण कुरुंदकर

 बुलडाणा दि 12-  जिल्हयात लोकसभा निवडणूक निर्भय व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी अधिका-यांनी सजग राहून काम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी केले.    जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात निवडणूक संदर्भात आयोजित प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्यामराव दिघावकर,अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी रमेश घेवंदे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.    निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था  राखणे इथवर मर्यादीत न राहता इतर पध्दतीने होणा-या खर्चाचे नियंत्रण होईल या दृष्टीकोणातून पोलीसांनी प्राप्त अधिकारांचा वापर करावा. लागू करण्यात आलेल्या आदेशांचा भंग करणा-यांवर धडक गुन्हे नोंदविण्याच्या सूचना     जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.    शासकीय इमारती, विश्रामगृहे यांचा वापर राजकीय हेतूसाठी होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे सांगून ते म्हणाले की निवडणुक कालावधीत विवाह प्रसंगी होणा-या भेटवस्तूचे होणारे वाटप तसेच जेवणावळी आणि दारुची वाहतूक यावर सर्व अधिका-यांनी लक्ष ठेवावे.    आचारसंहिता कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन भरारी पथके यावेळी असणार आहेत या पथकामध्ये एक कार्यकारी दंडाधिकारी दर्जाचा अधिकारी राहणार आहे. या पथकामध्ये एक व्हिडीओ कॅमेरा देखील असणार आहे. या कालावधीत 10 लाख रुपये आणि 1 किलोपेक्षा अधिक सोने यांची वाहतूक होत असेल तर त्याबद्यल गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.    सोशल मिडियाचा प्रचारासाठी वापर मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व अधिका-यांनी आपल्या स्तरावर लक्ष ठेवावे व असा काही प्रकार असेल तर लगेच नियंत्रण कक्षास कळवावे असेही ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment